पवनी (भंडारा) - येथील एका 26 दिवसाच्या चिमुकलीचा मृतदेह पाण्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुकलीची हत्या केली गेली आहे आणि ही हत्या कुटुंबातीलच व्यक्तीने केली आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना शहरातील गौतम वार्डमध्ये 22 जूनला सायंकाळी उघडकीस आली.
निश्चय निजाम रामटेके या युवकाचा मागील वर्षी अल्फीया हिच्यासोबत आंतरधर्मीय विवाह झाला. रामटेके कुटुंबीयांनी पुत्र प्रेमापोटी अल्फीया हिला सून म्हणून स्विकारत स्वागत समारोह पार पाडला. यानंतर निश्चय आणि अल्फीयाचा सुखी संसार सुरू झाला. यातच अल्फियाने 26 दिवसापूर्वी दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. कुटुंबातील सर्व मंडळी आनंदात होते. मात्र, 22 जूनच्या सायंकाळी घरी जुळ्या मुलींपैकी एकीचा मृत्यूदेह घरातील बाथरूममध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यात आढळून आला.
हेही वाचा - परिस्थिती आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू होणार नाही - अजित पवार
निश्चय यांचे भाऊ अक्षय निजाम रामटेके यांनी तक्रार दाखल करताना अल्फीया यांच्यावरच संशय व्यक्त केला आहे. घटना घडली त्यावेळी अल्फीया आणि निश्चयची आजी मंजुळा वंजारी या दोन्हीच घरी होत्या. वडील आणि तक्रारकर्ता भाऊ चष्मा बनविण्यासाठी बाजारात तसेच आई चक्कीवर दळण आणायला गेली होती.
या घटनेनंतर नवजात मुलगी तिथे कशी गेली? तिला तिथे कोणी नेऊन टाकले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या निष्पाप मुलीची हत्या कुणी आणि कशाकरिता केली असावी? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.