भंडारा - जिल्ह्यात आज पुन्हा 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. त्याचबरोबर, साकोली तालुक्यातील रुग्णांची संख्या 18 आणि लाखांदूर तालुक्यातील रुग्णांची संख्या 11वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ही 40वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण 12 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लाखांदूर तालुक्यातील 26 आणि 28 वर्षीय दोन तरुण मुंबईवरून 15 आणि 16 मे ला लाखांदूर तालुक्यात आले होते. या दोन्ही रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले. 30 मेला त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढून 40वर पोहोचली आहे. 2 रुग्ण वाढले असले तरी समाधानाची गोष्ट म्हणजे 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता 28 रुग्णांवर कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
40 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे साकोली तालुक्यातील
जिल्ह्यातील एकूण 40 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे साकोली तालुक्यातील असून त्यांची संख्या 18 आहे, लाखांदूर 11, भंडारा 5, पवनी 3, तुमसर, मोहाडी, लाखनीमध्ये प्रयत्येकी एक रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, 3 रुग्ण हे भंडारा शहरातील असून उर्वरित सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत आणि सर्व रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत. ग्रामीण भागात कोरोना ज्या पद्धतीने आपले पाय पसरत आहे त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आतापर्यंत 2075 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 40 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 1997 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 38 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. तसेच आज 3 जून रोजी जिल्हा विलगीकरण वॉर्डमध्ये 32 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 330 व्यक्तींना विलगीकरण वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 240 रुग्ण भरती आहेत. 1530 व्यक्तींना रुग्णालय विलगीकरणामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.