भंडारा - जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रुयाड ( सिंदपुरी ) येथे महासमाधीभूमी महास्तूपाचा १२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाला देश-विदेशातील भन्ते आणि हजारो भाविकांनी हजेरी लावली. यावेळी संपूर्ण परिसर हा बुद्धमय झाला होता.
१९८२ पासून बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या पन्ना-मेत्ता पत्ता संघ महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर तसेच तामिळनाडू व नेपाळ येथे शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवनी तालुक्यात २००७ मध्ये महासमाधी भूमी महास्तूपाचे लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी १३०० वर्ग फूट उंच निर्माण करण्यात आला असून १५ फूट उंच तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व देंग्योदईशी साईच्यो यांची प्रत्येकी ६ फूट उंचीची ग्रॅनाइटची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
या परिसरात भगवान गौतम बुद्धाच्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. धम्माची शिकवण देताना, खीर घेताना, झोपलेल्या अवस्थेतील या मूर्ती सर्वांचे लक्ष केंद्रीत करतात. स्थापना दिवसाचे औचित्य साधून सकाळपासूनच येथे भाविकांची गर्दी जमते. हजारो भाविक या महास्तुपात बुद्धाच्या आणि आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. त्यामुळे संपूर्ण परिसर धम्ममय होतो. या कार्यक्रमास देश विदेशातील भन्ते हजेरी लावतात. सकाळी निलेश फाट्यावर बौद्ध भन्ते भिक्खूंचे स्वागत करून संपूर्ण पवनी शहरात धम्मा रॅली काढली जाते. त्यानंतर ही रॅली महास्तूपा येथे आल्यावर भारतीय जपानी तिबेट पद्धतीने बुद्ध पूजा पाठ करण्यात येते. पूजेनंतर भाविकांना बुद्ध धम्माविषयी भन्ते मार्गदर्शन करतात.
ज्याप्रकारे जळणाऱ्या एका दिव्यापासून हजारो प्रकाश देणारे दिवे आपण पेटवू शकतो. त्याप्रमाणे आनंद वाटत गेल्याने तो अधिकाधिक वाढत जातो. त्यामुळे सर्वांना सुखी ठेवण्यासाठी आनंद वाटण्याचे काम करण्यास भगवान बुध्दांनी सांगितले आहे. हे विचार आज आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत पन्ना-मेत्ता संघ जपान कमिटीचे अध्यक्ष भदंत खोशो तानी यांनी मांडले.
पन्ना-मेत्ता संघाचे कार्य हे देश-विदेशातील अनेक राज्यात सुरू आहे. संघाच्या सम्यक कार्यामुळे सुरुवातीच्या काळापासूनच जनतेचे सहकार्य मिळत आहे. महासमाधी महास्तूपा भारत व जपानच्या मैत्रीचे प्रतिक ठरले आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष संघरत्न मानके यांनी सांगितले.