बीड- जिल्ह्यातील कुर्ला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील एका सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अजिज शेख या विद्यार्थ्याने पवन ऊर्जेवर वीज निर्मिती केली आहे. त्यामुळे शाळा वीज बिल मुक्त झाली आहे. विद्यार्थ्याच्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा- कोरोना : मास्क अन् सॅनिटायझरचा काळाबाजार; पुण्यातील चार मेडिकल दुकाने सील
बीड शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्ला गावात पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेचे मागील पाच वर्षांपासून वीज बिल थकीत असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान, शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक भाऊसाहेब राणे विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा बद्दल शिकवत होते. यावेळी अजिजने आपण शाळेत विज तयार करू शकत नाही का? असे शिक्षकांना विचारले. यावेळी अजिजची कल्पकता पाहून सरांनी होकार देत पवनचक्की बनवण्याचे ठरवले.
पवनचक्की बनवण्यासाठी आवश्यक साहित्य जमा करुन विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पवनचक्की बनवली. यातून तब्बल 100 युनिट वीज तयार होत आहे. यासाठी केवळ पाच हजारांचा खर्च आला. सौर ऊर्जेचे पॅनलही बसवण्यात आले आहेत. यामधून जवळपास 400 युनिट वीज तयार होते. यावर शाळेतील तीन टीव्ही संच, तीन वर्ग खोल्या मधील फॅन, संगणक, वॉटर प्युरिफायर व इतर इलेक्ट्रॉनिक संसाधने चालत आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयोगातून तयार केलेल्या या उपकरणातून आज शाळा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे. यामुळे आता वीज बिल शाळेला भरावे लागणार नाही.
शाळेचा आदर्श घेऊन इतर शाळांनीही असे नवनवीन प्रयोग करावे, असे या शाळेचे विज्ञान विषयाचे शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी सांगितले. आज ग्रामीण भागातही लहान बाल शास्त्रज्ञ विद्युत निर्मिती करू शकतात याचा आदर्श कुर्ल्याच्या शाळेला दाखवून दिलेला आहे.