बीड - जिल्हा परिषदेच्या शाळेमधील ३६ वर्षीय शिक्षकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. अद्याप आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - पतीच्या प्रेमसंबंधामुळे इंजिनिअर पत्नीची आत्महत्या, पती गजाआड
कमलाकर अभिमान खंदारे (३६ रा. कारेगाव ता. बीड) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. खंदारे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज (शनिवारी) दुपारी त्यांनी धनगरवाडी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या शिक्षकाने आत्महत्या का केली? याचा पोलिस तपास करत आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी जिल्हारुग्णालयात ग्रामीणचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत बेडे यांनी भेट दिली.
हेही वाचा - बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या
आत्महत्या केलेल्या शिक्षकाजवळ चिठ्ठी सापडली असल्याचे बडे यांनी सांगितले. त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे, हे पोलिसांनी सांगितले नाही. या आत्महत्येप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.