आष्टी (बीड) - तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील पंचवीस वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. 5) घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करताच सदरील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावात माहेरी आलेल्या विवाहितीची सात वर्षीय मुलगी खेळण्यासाठी बाहेर आल्याची संधी पाहून नात्यातील एका पंचवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केले. मुलीने घरी आल्यावर सदरील प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यावरून पीडितेच्या आईने अंभोरा पोलिसात शनिवारी (दि. 5) गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी सदरील आरोपीस अटक करून रविवारी (दि. 6) न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ज्ञानेश्वर कुकलारे करत आहेत.