केज - कृषी पदवी मिळाली पण नौकरीचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत काय करायचे? व्यवसाय करायचा झाला तर भांडवल घोळत असताना केज तालुक्यातील साळेगाव येथील अवघ्या पंचवीस वर्षे वयाच्या कृषी पदवीधर तरुणाने एक साहसी व धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे ऐन उन्हाळ्यात ढोबळी मिरची लागवडीचा. गजानन इंगळे या तरुण शेतकऱ्याची ही यशोगाथा..
केज तालुक्यातील साळेगाव येथील गजानन इंगळे हा कृषी पदवीधर आहे. पदवी प्राप्त होताच एक नोकरी करण्याची इच्छा त्याची होती, पण तोपर्यंत काय? नौकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. तसेच आपल्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्यातून आपलेही अर्थार्जन करावे म्हणून दुसरा विचार केला की, किमान कृषी सेवा केंद्र सुरू करावे. पण त्याला भांडवल स्पर्धेत या व्यवसायातील प्रस्थापित यांच्यापुढे कसा निभाव लागणार? त्यात यशस्वी होऊ की नाही. असे अनेक प्रश्न गजाननच्या मनात होते. पण त्याच्यातील जिद्द आणि धडपड कमी होत नव्हती. मग त्याने एक वेगळाच मार्ग निवडला. तो म्हणजे आपली वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पीक न घेता आपल्या कृषी पदवीच्या ज्ञानाचा उपयोग करायचे ठरवले. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षांपासून बंद, संचारबंदी व लॉकडाऊन सुरू आहे. तरी देखील त्याने हिम्मत दाखवून ऐन उन्हाळ्यात आपल्या एक एकर क्षेत्रावर बेळगाव पोपटी या वाणाची ढोबळी मिरची लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने जमीन तयार करून त्याला शेणखत, कंपोस्ट मल्चिंग केले. त्यात ५×१ अंतरावर ६ फेब्रुवारी रोजी लागवड केली. त्यासाठी त्याला १३००० रोपे लागली. त्याला ड्रीपद्वारे खत व औषध फवारणी केली. त्यानंतर लागवडीपासून ५०व्या दिवसापासून मिरची बहरात आली आहे.
आतापर्यंत ४ वेळा मिरचीची तोडणी केली आहे. आतापर्यंत सुमारे १२.५ टन एवढे उत्पन्न निघाले आहे. सध्या ही मिरची कलंबच्या व्यापाऱ्यामार्फत हैदराबाद येथे विक्रीसाठी जात आहे. सध्या या मिरचीला सुमारे २० ते २२ हजार रुपये टन भाव आहे. आतापर्यंत चार वेळा मिरचीची तोडणी झाली आहे त्यातून त्याला २ लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. सुमारे ३५ ते ४० टनाच्या आसपास मिरचीचे उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. यातून सुमारे साडेसहा ते सात लाखाच्या आसपास उत्पन्न होण्याची खात्री गजाननला आहे. यामुळे गजानन इंगळे याने एक एकर जमिनीत अवघ्या तीन महिन्यात सुमारे साडेसहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी गजानन आदर्श आहे.
मागील वर्षी मी अशाच प्रकारे शेवग्याचे उत्पन्न घेतले होते. त्यातून मी दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. त्यामुळे तरूणांनी नोकरी नाही म्हणून खचून न जाता पारंपरिक शेती ऐवजी जर आधुनिक पद्धतीने शेती केली आणि बाजारभावाचा अंदाज घेऊन लागवड केली तर निश्चित फायदा होतो, असे गजानन इंगळे यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनमुळे आम्ही गजानन इंगळे याच्या शेतात एक महिन्यापासून कामाला आहोत. त्या मजुरीतून आम्ही आमच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न भागवत आहोत, असे तेथील मजूर निलावती सरवदे यांनी सांगितले.
खर्च :-
१) रोपे - १५००० रु
२) मल्चिंग - १५००० रु
३) बेसल डोस - १०००० रु.
४) फवारणी व अंतर मशागत - ५०००० रु.
५) मजुरी - ३०००० रु
६) पेरणीपूर्व मशागत व इतर - ३०००० रु.
एकूण खर्च :- १५०००० रु.