बीड- जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेश स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे बीड तालुक्यातील चौसाळा येथे महिलांनी पुढाकार घेत महिला गणेश मंडळ तयार केले. यावेळी महिलांनीच पुढाकार घेत गणरायाची स्थापना देखील केली. या उत्सवानिमित्त पुढील ७ दिवस या महिला गणेश मंडळाच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव, महिला हक्क व कायदे, बचत गट व जलसंवर्धनाबाबत संदेश देणार असल्याचे गणेश मंडळाच्या अध्यक्षा वर्षा बाजीराव तिदार यांनी सांगितले आहे.
मागील दोन वर्षापासून या जय हिंद महिला गणेश मंडळाची सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी चौसाळा शहरातून महिलांनी गणेश मूर्तीची मिरवणूक काढली. यावेळी जय हिंद महिला गणेश मंडळाच्या सर्व महिला सदस्यांची उपस्थिती होती. साधारणतः २० ते २५ लोकसंख्येचे गाव असलेल्या चौसाळा येथे गेल्यावर्षीपासून महिलांनी पुढाकार घेत गणेश उत्सवाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. एकीकडे स्त्रीभ्रूणहत्येमुळे जिल्ह्याचे नाव खराब झाले आहे, तर दुसरीकडे जय हिंद महिला गणेश मंडळाच्या या अनोख्या गणेशोत्सवामुळे जिल्ह्याची मान उंचावत आहे.
यावेळी गणेशोत्सवा दरम्यानच्या सात दिवसात महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविले जाते. यामध्ये रांगोळी स्पर्धेतून पाणी बचतीचा, जलसंवर्धनाचा संदेश तसेच महालक्ष्मी सजावटमधून सामाजिक संदेश, याशिवाय महिला हक्क व कायदे याबाबत व्याख्यान ठेवले जाते. एकंदरीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम जय हिंद महिला गणेश मंडळाच्या वतीने राबविले जात असल्याचे गणेश मंडळाच्या महिला सदस्यांनी सांगितले.
यंदा गणेश स्थापनेच्या दिवशी अध्यात्मिक क्षेत्रातील महाराजांना बोलावून त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यामध्ये हरिहर महाराज भारती, श्रीहरी महाराज पवार, नाना महाराज कदम, केशव महाराज वैष्णव, नामदेव महाराज कवडे, धोंडीराज महाराज बटुळे, आदींच्या हस्ते गणेश स्थापनेनंतर आरती करण्यात आली. पुढील सात दिवस गणेश मंडळातील एक महिला सदस्य व सदर महिला सदस्येच्या पतीच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे.