बीड - चार घरी धुणी-भांडी करून जगणाऱ्या एकल महिला रेखा देवकते या मागील एक महिन्यापासून हलाखीत जगत आहेत. 1 वर्षापूर्वी नवऱ्याने आत्महत्या केली. सोबत दीड वर्षाची मुलगी त्यातच सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे संचारबंदी आहे. हाताला काम नाही. जगायचं कसं? हा प्रश्न रेखा देवकते यांच्यासमोर आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून एक महिनाभर त्यांनी या परिस्थितीत कशा प्रकारे तोंड देत आहेत, याबाबतची व्यथा त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना मांडल्या आहेत.
रेखा देवकते या विधवा आहेत. त्या एका लहान खोलीत आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह राहतात. ते व त्यांचे पती ऊसतोडणीचे काम करत होते. मात्र, एक वर्षापूर्वी त्यांच्या पतीने आत्महत्या केली. आता मुलीशिवाय त्यांचे या जगात दुसरे कोणीच नाही. रेखा या चार घरी धुणी-भांडी करून कसंतरी काटकसरीचे जीवन जगतात. मात्र, एक महिन्यापासून धुणी-भांड्याचे काम देखील बंद आहे. त्यामुळे घरात पैसे नाहीत. बाहेर जाऊन काही काम करावे, तर लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत काम मिळणार तरी कसं? अशा दृष्टचक्रात रेखा एक महिन्यापासून अडकलेल्या आहे.
रेखा यांच्याकडे ना रेशनकार्ड आहे, ना आधार कार्ड. त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य देखील मिळाले नाही. या वाईट परिस्थितीत मागील एक महिन्यात त्यांनी मिठाबरोबर भाकर खाऊन दिवस काढले. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांना आता मदतीची गरज आहे.
जिल्ह्यात अशा अनेक 'रेखा' आहेत - मनीषा तोकले
रेखा देवकातेसारख्या बीड जिल्ह्यात शेकडो एकल महिला आहेत. घरात कोणी कर्ता पुरुष नाही. त्यातच एकल महिला म्हटल्यावर मदत मागायची कोणाला? बाहेर जावं तर संचारबंदी आहे. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न या एकल महिलांसमोर निर्माण झाला आहे. यातील बहुतांश महिलांकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड देखील नाही. अशा सगळ्या वाईट परिस्थितीतून जाणाऱ्या या एकल महिलांसाठी सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केली आहे.