बीड - भाजप कायम द्वेष पसरवण्यासाठी राजकारण करते. त्यांना स्फोट घडवण्यासाठी सत्ता पाहिजे. मोहन भागवतांवर बॉम्बस्फोटाचा आरोप होऊनही सरकार भागवतांना का पकडत नाही? त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. बीड येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
चळवळी हा देशाचा कणा आहे. मात्र, या चळवळी संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संघाच्या एका माजी प्रचारकाने आठ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन देशात जे बॉम्बस्फोट झाले ते संघाने घडवले आणि त्यात मोहन भागवतांचा हात होता, असा आरोप केला आहे. बॉम्बस्फोटाचा आरोप होऊनही सरकारने भागवतांना का पकडले नाही. हाच आरोप जर एखाद्या वंचित समुहाच्या व्यक्तीवर झाला असता तर पोलिसांनी त्याला तुरूंगात टाकले असते. अशी जोरदार टीका प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर केली.
हेही वाचा - 'राहुल गांधींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, तेवढ्या आमच्या जागा वाढतील'
भाजप आणि आरएसएसवाले सर्व हिंदूंनी एकत्र यावे असे म्हणतात. मग अठरापगड जातीला उमेदवारी का देत नाहीत. यांचा धर्मवाद केवळ राजकारणासाठीच आहे. सामान्यांना न्याय देण्यासाठी वंचित आघाडीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
आंबेडकरांच्या सभेला अशोक हिंगे (बीड), विष्णु देवकते (गेवराई), धम्मानंद साळवे (माजलगाव), वैभव स्वामी (केज), भिमराव सातपुते (परळी), नामदेव सानप (आष्टी) यांच्यासह अजिंक्य चांदणे, शिवराज बांगर, प्रा.विष्णु जाधव हे उपस्थित होते.
चुलत्या-पुतण्यांनी शहराचे वाटोळे केले...
बीड शहराला भकास करण्याचे काम क्षीरसागर चुलत्या-पुतण्यांनी केले आहे. या दोघांनीही शहराचे वाटोळे केले. आत्ता ते एकमेकांच्या विरोधात असल्याचे दाखवत आहेत. मात्र, दोघांच्याही हातात मतदार संघ सुरक्षित नाही. दलितांवर कोणी अन्याय केला हे सर्वांनाच माहित आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केला.