बीड - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे मतदान मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झाले. बीड जिल्ह्यात एकूण १३१ मतदान केंद्रावरून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून ६४,००० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शांततेत मतदान सुरू झाले असून सकाळच्या सत्रामध्ये पदवीधर मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र बीड परिसरातील मतदान केंद्रांवर पाहायला मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मतदान केले जात आहे.
हेही वाचा - मॅराडोना यांचा मृत्यू दुर्लक्षपणामुळे?
बीड शहरातील चंपावती विद्यालयाच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासूनच पदवीधर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान केंद्राच्या परिसरातच सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापले बुथ उभे केलेले असून मतदानासाठी येणाऱ्या पदवीधरांना त्यांचे नाव व नंबर शोधून देण्यासाठी मदत केली जात आहे. याशिवाय मतदान केंद्राच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे.
बीड जिल्ह्यात एकूण ६४ हजारांवर पदवीधरांचे मतदान असून १३१ मतदान केंद्रं उभारण्यात आलेली आहेत. शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी सर्व मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहेत. पदवीधर महिला मतदारांचा ही मतदानासाठी चांगला उत्साह असल्याचे चित्र पाहायला मिळाले.