बीड - जिल्ह्यातील परळी ते मांडवा मार्गावरील पूल पुर्णपणे खचला आहे. असे असतानादेखील त्या पुलावरून वाहतूक केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा पूल अपघाताला निमंत्रण देत असून अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न वैजवाडी, मांडवा, मिरवट, कासारवाडी येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काही अनुचित दुर्घटना घडण्याअगोदर या पुलाचे नुतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थी करत आहेत.
परळी शहरातून वैजवाडी, मांडवा, मिरवट, कासारवाडीसह अनेक ताड्यांकडे जाणारा रस्ता असून याच रस्त्यावर घनशी नदीवरील पूल खचला असून धोकादायक बनला आहे. सध्या या पुलाची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. त्यामुळे पूल कधीही पडू शकतो, अशी स्थिती आहे. या रस्त्याने गावकरी, विद्यार्थी यांची परळी शहराकडे सतत ये-जा असते, तर परळीतील काहींची शेती घनशी नदीच्या पलीकडे असल्याने त्यांना सतत त्या खचलेल्या पुलावरून ये- जा करावी लागते.
हा पूल कोसळून काही अनुचित प्रकार घडण्याअगोदरच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या पुलाचे लवकर नुतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.