लखनऊ /बीड: उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणी एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, धर्मांतरासाठी परदेशातून निधी मिळत आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात तीन धर्मगुरूंची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले. एटीएस आता तिन्ही धार्मिक गुरूंची चौकशी करून धर्मांतर प्रकरणाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, या आरोपींच्या कॅनडा आणि कतार कनेक्शनची चौकशी सुरू आहे.
दिल्लीमधून याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी इरफान शेख हा मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. इतर दोन आरोपींपैकी एक राहुल भोला हा दिल्लीतील उत्तम नगर येथील शिश्राम पार्कचा रहिवासी आहे, तर मन्नू यादव हरियाणाच्या गुडगाव जिल्ह्यातील बापूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. तर, मन्नू यादवने मुलांचे धर्मपरिवर्तन केले होते, असं म्हटलं जातंय.
मुळचा बीडचा असलेला इरफान हा दिल्लीच्या मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेलफेयरमध्ये इंटरप्रेटर म्हणून काम करतो. तो मूक-बधीर लोकांना इस्लाम शिकवतो. इरफाननेच मूक-बधिराला आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले. दुसरा युवक राहुल भोला हा स्वतः मूक बधिर आहे. तो या कामात इरफानची मदत करत होता. इरफानबाबत बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रदीप एकशिंगे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सिरसाळा पोलीस ठाण्याला या प्रकरणाबाबत कुठलीच लेखी माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी सिरसाळा गावच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
उमर गौतमच्या इस्लामिक दावा सेंटरने केलेल्या धर्मांतरात उत्तर प्रदेशच्या एटीएसद्वारे उत्तर प्रदेशातील लोकांची देखील पडताळणी केली जात आहे. इस्लामिक दावा सेंटरच्या खात्यांची चौकशी केली असता 1 कोटी 82 लाख 83210 रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.जेव्हा एटीएसकडून उमर गौतमच्या खात्यांची चौकशी केली गेली तेव्हा फातिमा चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात जमा केलेली रक्कम त्यांनी वैयक्तिकरित्या वापरल्याचे उघड झाले. इस्लामिक दावा सेंटर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या खात्यात एक कोटी ८२ लाख ८३ हजार २१० रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याचबरोबर परदेशातूनही 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यामध्ये रियाध, कतार आणि अबू धाबी देशांचा समावेश आहे. तीच रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली जात असल्याचेही आढळले आहे.
मोहम्मद उमर या धार्मिक गुरूंच्या माध्यमातून मूक-बधिर विद्यार्थ्यांना ब्रेनवॉश करायचा. सुरक्षा एजन्सी या धार्मिक नेत्यांच्या कॉल डिटेल रिपोर्ट, सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटी शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून धर्मगुरू धर्मांतराबद्दल कोणाशी बोलत असत याबाबत माहिती मिळवता येईल. गेल्या आठ महिन्यांत त्याच्या वतीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची तपासणीही केली जात आहे. धर्म परिवर्तन प्रकरणात अटक केलेले उमर गौतम आणि जहांगीर आलम यांची एटीएसची चौकशी सुरू आहे. देशातील 24 राज्यात ओमरचे नेटवर्क पसरल्याचा दावा केला जात आहे. एटीएस याची पडताळणी करीत आहे. उमर यांनी नमूद केलेले पत्ते शोधण्यासाठी यूपी पोलीस संबंधित राज्यातील पोलिसांना याबाबत माहिती देत आहेत, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले आहे.