बीड - राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. मंगळवारी गंगाखेडमार्गे परळी येथे आले असता उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले.
हा दौरा राजकीय नसल्यामुळे उद्धव ठाकरे हे गोपीनाथ गडावर भाषण करण्यासाठी बनवलेल्या स्टेजवर देखील गेले नाहीत. या शिवाय कुठलेही राजकीय भाष्य न करता औरंगाबादकडे प्रस्थान केले. यादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी मात्र अनुपस्थित होते. मुंडे भक्तांनी यादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने झालेला पराभव व राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी भाजप-शिवसेनेत तू तू मै मै सुरू आहे. या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर येत असल्याचा येत असल्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याशिवाय गोपीनाथ गड येथे मंगळवारी समाधी स्थळाच्या ठिकाणी काढलेली रांगोळी राजकीय सूतोवाच करणारी होती. खाली धनुष्यबाण व बाणाच्या टोकावर कमळाचं फुल अशी ती रांगोळी काढण्यात आली होती. ही केवळ रांगोळी आहे की, राजकीय सूतोवाच यावरदेखील मोठी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनीच हा दौरा केवळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठीचा आहे, असे स्पष्ट केल्यामुळे गोपीनाथ गडावरील त्या रांगोळीला व मुंडे- ठाकरे यांच्या राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गोपीनाथ गडावर उद्धव ठाकरे येणार आहेत म्हटल्यावर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी स्टेज उभारले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्टेजवर न जातात थेट औरंगाबादकडे प्रस्थान केले. त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे देखील यावेळी टाळले.