बीड - वाढती बेरोजगारी आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे बीड जिल्ह्यात मागील 24 तासात दोन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आता बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. यामुळेच असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.
डी. एड. करुनही नोकरी नसल्याने आत्महत्या..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामधील आसरडोह येथे बाळासाहेब ज्ञानदेव काचगुंडे (32) या तरुणाने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली. बाळासाहेब काचगुंडे या तरुणाने डी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. काही महिन्यांपासून बाळासाहेब हे नोकरीच्या शोधात होते. मात्र सध्या शिक्षक भरती बंद आहे. अशा परिस्थितीत हाताला काम नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून बाळासाहेब यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
२५ वर्षीय तरुणाने संपवला जीवनप्रवास..
दुसरी घटना धारूर शहरातील अंबाजोगाई रोडवर जय प्रदीप जगताप (वय 25 वर्ष) या सुशिक्षित बेरोजगार युवकाने हाताला काम नसल्यामुळे रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकंदरीतच कोरोनाच्या संकटानंतर वाढत्या बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेकार तरुण नैराश्याच्या गर्तेत अडकत चालले असल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासात घडलेल्या या दोन्ही घटना बेरोजगारीशी संबंधित असल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.