बीड - पोलीस पैसे घेण्यासाठीच असतात... असा निर्ढावलेला संवाद असलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर नियंत्रण कक्षात हलविलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अखेर मंगळवारी निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, यामध्ये कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आर्थिक देवाणघेवाणीचा संवाद आहे. या संवादातील एकास व त्याच्या सहकाऱ्यास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तीन दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात हलविले होते. मंगळवारी त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. परमेश्वर सानप व गणेश हंगे अशी त्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एकंदरीतच त्या व्हायरल क्लिपमुळे पोलास प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यामुळे अखेर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.