बीड - गेवराई तालुक्यातील गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील २० विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यालयातील एका सहशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर विद्यालय प्रशासनाने शाळेतील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करून घेतली. त्यातून तब्बल २० विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले.
नवोदय विद्यालयातदेखील कोरोनाचा शिरकाव -
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता कोरोनाचे हॉटस्पॉट होताना दिसत आहेत. राज्याच्या अनेक भागात निवासी शाळा आणि वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र असतानाच आता गढी येथील नवोदय विद्यालयातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली, यात २० विद्यार्थी कोरोनाबाधित सापडल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले. या विद्यालयाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन खाडे यांनी केले आहे.
हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर