बीड - जिल्ह्यामध्ये आज (शनिवारी) 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून 293 जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. शनिवारी पहाटे तीन वाजता अहवाल प्राप्त झाले. 293 अहवालांपैकी 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 273 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मागील तीन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये बीड 8, परळी 4, गेवराई 6, आष्टी आणि धारुर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
बीडमध्ये संत तुकाराम नगर येथे 59 वर्षीय पुरुष, चौसाळा येथील 43 वर्षीय पुरुष. परळी येथील विद्यानगर, नथरा, गुरुकृपा नगर (गेवराई), इस्लामपूर भागातील 3 कोरोना रुग्ण, मोमिनपुरा भागात 2 कोरोना रुग्ण, आष्टीमधील दत्तनगर आणि धारुरमधील साठे नगर भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सद्यपरिस्थितीत बीड जिल्ह्यात 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 117 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.