बीड - न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यात एका कुमारी मातेचा विवाह लावून देण्यात आला. स्वाधार गृहाचे प्रमुख एस.बी.सय्यद यांच्या मध्यस्थीने हा विवाहसोहळा पार पडला. यामुळे एका मुलीचं साडेतीन वर्षानंतर पुनर्वसन झाल्यामुळे एक आदर्श विवाह म्हणून याकडे पाहिल जातंय.
यादरम्यान हर्षदा व तिच्या मुलीचा संभाळ एस.बी.सय्यद यांच्या स्वाधार गृहाने केला. अखेर कोर्टाने या दोघांचे लग्न लावून देण्याचे आदेश दिल्यानंतर सामाजिक न्याय भवन येथे राहुल व हर्षदा यांचा विवाह लॉकडाऊनमध्ये दहा जणांच्या उपस्थित संपन्न झाला. या लग्नासाठी समाज कल्याण अधिकारी सचिन मडावी, स्वाधार गृहाचे प्रमुख एस.बी.सय्यद, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे, तत्वशील कांबळे, उमेश होमकर, आशा धनवडे, उषा जाधव, बालकल्याण समितीचे वनवे यांनी उपस्थिती लावली.
'अखेर हवं होतं ते मिळालं'
आम्हाला जे हव होतं ते मिळालं', असे म्हणून राहुल आणि हर्षदा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अखेर तीन वर्षांच्या संघर्षानंतर आम्हाला न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या लढ्यात स्वधार गृह संस्था तसेच बालकल्याण समितीचा आधार मिळाला. आता आम्ही खूष आहोत. असे राहुल व हर्षदा यांनी सांगितले.
समाजात कुमारी मातांच्या प्रकरणांमध्ये पीडित मुलीचे पुनर्वसन करण्याचे प्रमाण अल्प आहे. मात्र योग्य पद्धतीने प्रकरण हाताळल्यास महिलांचे योग्य पूनर्वसन करता येऊ शकते. कुमारी मातांच्या बाबतीत सामाजिक प्रतिष्ठा हा कळीचा मुद्दा असतो. मात्र, सतारात्मकतेच्या बळावर यावर देखील मात मिळवता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणून शनिवारी(१६ मे) या विवाहाकडे पाहिले जाते.
विशेष म्हणजे राहुल व हर्षदा यांच्या लग्नात त्यांची तीन वर्षाची मुलगी रोहिका देखील उपस्थित होती. स्वाधार गृहाचे उमेश होमकर, आशा धनवडे, उषा जाधव यांनी सातत्याने मुला-मुलीच्या घरच्या मंडळींचे समुपदेशन केले. यामुळेच त्यांची मानसिकता बदलून राहुल व हर्षदा यांचा विवाह करण्यात यश आले. तसेच या प्रकरणांमध्ये न्यायालयाची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे आधार गृहाच्या वतीने सांगण्यात आले.
शासकीय वाहनातून 'बिदाई'
राहुल व हर्षदा यांचा बौद्ध पद्धतीने विवाह संपन्न झाला. विवाहानंतर समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी राहुल व हर्षदा यांना त्यांच्या मूळ गावी म्हणजेच धारूर तालुक्यातील रूई येथे जाण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्था केली. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी शासकीय वाहन देण्यात आले.