बीड - जिल्ह्यातील धारुर येथील माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव भीमराव शिनगारे (वय ५२, रा. कसबा, ता. धारुर) यांची हत्या झाली. या हत्येने सोमवारी संपूर्ण शहर हादरुन गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत सोमवरी रात्री दोघांना तर मंगळवारी एकास, अशा तिघांना अटक केली होती. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पैशांचा व्यवहार आणि जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून नामदेव शिनगारे यांची हत्या झाली होती. शिनगारे पालिकेत कारकून पदावर कार्यरत होते. त्यांची पत्नी सविता २०१३-१४ मध्ये राष्ट्रवादीकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पुढे भाजपकडून नगराध्यक्षा झाल्या. दरम्यान, शिनगारे यांनी धारुरमधील सुखदेव प्रभाकर फुन्ने यांना मुलीच्या लग्नासाठी ३ लाख रुपये दिले होते. ते परत द्यावेत, यासाठी शिनगारे यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता. पैसे परत देणे होत नसल्याने फुन्ने यांनी शहरापासून एक कि. मी. अंतरावरील केज रोडवरील त्यांची जमीन शिनगारे यांना देण्याचे ठरले होते. याची बोलणी करण्यासाठी सोमवारी दुपारी शिनगारे व फुन्ने हे अन्य काही लोकांसमवेत एकत्रित आले होते.
दुपारी चार वाजता फुन्ने यांच्या शेतात बोलणी सुरू असताना दोन्ही उभयंतांमध्ये वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. यावेळी पैशांचा तगादा आणि अपशब्द वापरल्याने चिडलेल्या सुखदेव उर्फ बबन फुन्ने यांनी नामदेव शिनगारे यांच्या डोक्यात दगड घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश घोडके हा जखमी झाला होता. या प्रकरणी सुदर्शन नामदेव शिनगारे यांच्या फिर्यादीवरुन धारुर पोलिसांत सुखदेव उर्फ बबन प्रभाकर फुन्ने, गणेश शिवाजी घोडके, सुभाष तुकाराम शिंदे व अनोळखी तीन लोकांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
.....या ठिकाणांहून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले
दरम्यान, पोलिसांनी सोमवारी रात्री जखमी गणेश घोडकेला अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयातून ताब्यात घेतले तर सुभाष शिंदेस केज जवळ बेड्या ठोकल्या. मंगळवारी दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक निरीक्षक गजानन जाधव आणि युसूफवडगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंद झोटे यांनी धारुरातील एका पडक्या वाड्यात लपलेल्या सुखदेव उर्फ बबन फुन्ने याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे. मंगळवारी २४ तासानंतर दुपारी ४ वाजता नामदेव शिनगारेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
अटक केल्यानंतर गणेश घोडके व सुभाष शिंदे या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती, तपास अधिकारी फौजदार एस. ए. माळी यांनी दिली. यावेळी सुखदेव फुन्नेला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.