बीड - सततचा दुष्काळ, त्यामुळं शेतात येणारी नापिकी यामुळे कुंटुंबाची वाताहत सुरु आहे. पाच वर्षांपूर्वी नवऱ्याने 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मधून ४० हजार रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र, सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे बँकेचे घेतलेले पैसे परत करु शकलो नाही. याच नैराश्येतून पती मदन मस्के यांनी वर्षभरापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. आता दोन मुलं आणि एक मुलगी बरोबर घेऊन विद्या मदन मस्के (३०) या परिस्थितीशी दोन हात करत संसाराचा गाडा हाकतायेत....
बीड तालुक्यातील पालवणमधील विद्या मदन मस्के या तीस वर्षीय महिला शेतकऱ्याने आपली व्यथा समोर मांडली आहे. सध्या विद्या मस्के यांच्याकडे बँकेचे आणि इतर लोकांचे मिळून दीड लाख रुपयांचे कर्ज आहे.
चालू वर्षाच बीड जिल्ह्यात ८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बीड जिल्ह्यात चालू वर्षात जवळपास 80 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीतून आलेल्या नैराश्येमुळे आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील विद्या मदन मस्के या तीस वर्षीय महिलेला ऐन तारुण्यात वैधव्य आले आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात अशा अनेक विद्या मस्के आहेत. ज्यांच्या आयुष्यात वैधव्य आले आहे.
भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी पैसा आणायचा कोठून
विद्या मस्के यांना तीन एकर जमीन आहे. दोन मुलं व एक मुलगी आहे. पहिला मुलगा सातवीच्या वर्गात आहे. दुसरा मुलगा पाचवीला आहे. तर मुलगी चौथीला असून ती पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एका सामाजिक संस्थेच्या शाळेत शिकत असल्याचे विद्या मस्के सांगतात. मुलांच्या शिक्षणाचा खर्च करायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आज घडीला निर्माण झालेला आहे. सध्या मुलांची शाळा सुरू आहे. मात्र, भविष्यात या मुलांचे शिक्षण करण्यासाठी पैसा आणायचा कोठून असा प्रश्न विद्या मस्के यांच्यासमोर उभा राहीलाय. विद्या यांच्याकडे बैल बारदाना नसल्याने त्यांनी यावर्षी तीन एकर जमीन एका व्यक्तीला ठेक्याने दिली आहे.
४० हजारांचे कर्ज आता दीड लाख झाले
५ वर्षापूर्वी पतीने 40 हजार रुपये कर्ज स्वरूपात बँकेतून घेतले होते. आता त्या 40 हजार रुपयांचे एक ते दीड लाख रुपये झाले असल्याचे विद्या मस्के यांनी सांगितले. याशिवाय इतर काही लोकांचे हात उसने घेतलेले पैसे आमच्याकडे आहेत. विद्या यांना आता राहण्यासाठी चांगले घर देखील नाही. ज्या ठिकाणी त्या राहतात त्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्या घरांच्या दुरुस्तीसाठी देखील विद्या यांच्याकडे पैसे नाहीत.
विधवा पेंशन योजनेचा लाभ नाही
सरकार आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या पत्नींना पेन्शन देते म्हणून सांगते. मी त्या योजनेचा अर्ज दाखल करून सहा महिने झाले तरी देखील आम्हाला विधवा पेंशन योजनेचा लाभ मिळालेली नाही. अशा अनेक समस्यांना आम्ही सामोरे जात असल्याची खंत विद्या मस्के यांनी व्यक्त केली.