बीड - पाली येथील ज्ञानदेव वीर यांना 6 दिवसांपूर्वी झाडावरून पडल्याने डोक्यावर जखम झाली होती. उपचारासाठी त्यांना बीडच्या जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या डोक्याला 7 टाके पडले. मात्र इतक्या दिवसांनंतर त्यांच्या डोक्यातील जखमेत अळ्या निर्माण झाल्या तरीही रूग्णालयातील डॉक्टरांकडून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही. अखेर हा व्हिडिओ समाजमाध्यंमांवर व्हायरल झाल्यावर या घटनेवर प्रकाश पडला आहे.
हेही वाचा... जळगावात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार तर दोघे गंभीर
बीड तालुक्यातील पाली येथील रहिवासी असलेले ज्ञानदेव निवृत्ती वीर (५५) हे दिनांक १४ नोव्हेंबरला शेतातील झाडावरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला 7 टाके घालण्यात आले. मात्र यानंतर 6 दिवस झाले तेव्हा त्यांच्या जखमेत अळ्या निर्माण झाल्याचे आढळून आले. रुग्णाकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले होते, तसेच त्यांच्या जखमेची मलमपट्टी देखील व्यवस्थीत केली जात नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा... शेजाऱ्याने पळवली शेजारीण; समजूत काढताना पोलिसांसह दोघांचेही कुटुंबीय झाले हैराण
नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगूनही डॉक्टर आले नसून याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष देण्याची त्यांनी मागणी केली होती. तर रूग्णालय प्रशासनाकडून मात्र या रुग्णाला मधुमेह असल्याने जखमेवर पट्टी करण्यास एक दिवस विलंब झाल्यामुळे रुग्णाच्या डोक्याच्या जखमेमध्ये अळ्या तयार झाल्याचे म्हटले आहे. असे असेल तरीही या प्रकारातून डॉक्टरांचा उपचाराबाबतीत निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.