अंबेजोगाई - कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे गतवर्षी बेरोजगार झालेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या काळात गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदार व अठरा आलुतेदारांचेही प्रचंड हाल झाले. या वर्गाकडे केंद्र सरकारने आणि समाज व्यवस्थेनेही लक्ष दिले नाही. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजपासून हा वर्ग तर कोसोदुरच राहिलेला आहे. त्यामुळेच लॉकडाऊन नंतरच्या काळात या वर्गावर बिकट परिस्थिती ओढवू नये, म्हणून लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा, अशी जाहीर मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे.
मागील वर्षांपासून राज्यासह बीड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत महाराष्ट्रातील परिस्थीती महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम रितीने हाताळली आहे. यावेळेसही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेतृत्वाने लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजमध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा, असे राजकिशोर म्हणाले.