बीड - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यात शासकीय आणि खासगी डॉक्टर जीव पणाला लावून रुग्णांवर उपचार करताना दिसत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक लोक घाबरून जात आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील एक सहा महिन्यांची गर्भवती महिला पॉझिटिव्ह आली. आता पुढे काय होईल, या भीतीपोटी महिलेने हंबरडा फोडला. अशा कठीण प्रसंगातून तिला बाहेर काढण्यासाठी खासगी डॉ. जीवनकुमार राठोड यांनी ताई घाबरू नकोस, काहीही होणार नाही असे म्हणत गर्भवती महिलेला चक्क मिठी मारत तिची समजूत काढली आहे. संबंधित डॉक्टरांनी दिलेला आधार महिलेसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
जिल्ह्याभरात माणुसकीची चर्चा
बीड जिल्ह्यात आज घडीला सात हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने आपले हात पाय पसरले आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णालय पूर्ण भरले आहेत. अशा बिकट परिस्थितीत जातेगाव येथे अंगावर शहारे आणणारा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून जिल्ह्यात सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जवळ जाणे हे तितकेच धोकादायक असले तरीही त्या कठीण प्रसंगात धीर दिल्याने डॉ. राठोड यांच्या माणुसकीची चर्चा जिल्हाभरात होत आहे. सध्या त्या महिलेवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टर जीवनकुमार राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा - 'कोरोना' संकटाविरुध्द एकजुटीने लढू; महाराष्ट्र दिनी अजित पवारांचा निर्धार