बीड - ग्रामपंचायत निवडणुकीत परळी तालुक्यातील गडदेवाडी गावात सुशांतसिंह पवार या तरुणाने सात पैकी चार जागा जिंकत गावची पंचायत ताब्यात घेतली. इंग्लंडमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह यांना आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा ध्यास आहे. त्यामुळेच त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
एका मताने झाला विजय -
आजकाल तरुणवर्ग राजकाणापासून काहीसा दुरावलेला पहायला मिळतो. मात्र, राजकरण व समाजकारण यांचा समतोल साधला तरच विकासाचा मार्ग मिळतो. हाच ध्यास मनात ठेवत अनेक तरुणांनी १५ जानेवारीला झालेली ग्रामपंचायत निवडणूक लढवली. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत अनेत तरुणांच्या ताब्यात सत्ता दिली. बीड जिल्ह्यातील गडदेवाडी या ठिकाणी देखील असेच चित्र पहायला मिळाले. इंग्लंडमधील नॉटींगहॅम येथे चार वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह पवार यांनी गडदेवाडीमध्ये ग्राम पंचायत निवडणूक लढवली. ही निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. गावातील जनतेने परिवर्तनाचा चंग बांधल्याने फक्त १ मताच्या फरकाने सुशांतसिंह पवार विजयी झाले.
जन्मभूमीचे ऋण फेडणार -
सुशांत यांचे वडील बळीराम पवार हे आयएएस अधिकारी असून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. मोठे कुटुंब असताना केवळ आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी सुशांतसिंह यांनी गावात येवून पॅनल उभा केला. त्यांचे सात पैकी चार सदस्य निवडून आले. गावाचा सर्वांगीण विकास करून जन्मभूमीचे ऋण फेडणार असल्याचे ते म्हणाले.
'या' मुद्द्यांवर करणार काम -
'मी सगळीकडे फिरलो. परंतु, माझे गाव आजही विकापासून दूर आहे. गावात उसतोड कामगारांची संख्या जास्त आहे. गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे मात्र, जागेअभावी ते बांधले गेले नाही. मी आता स्वत:च्या मालकीची जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देणार आहे. लहान मुलांची अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधली गेली आहे. तिचे स्थलांतर गावात करणार आहे. २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे. त्याची मी गावात अंमलबजावणी करणार. वृद्ध लोकांना पेन्शन मिळवून देणार. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी मी मुंबईत मोठा व्यवसाय असतानाही गावाकडे आलो आहे, असे सुशांतसिंह यांनी सांगितले.