बीड - शिक्षकाच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या गुज्जर टोळी विरुद्ध 'मोक्का' (महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा) लावण्यास विशेष पोलीस महानिरिक्षकांनी परवानगी दिली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात आता 'मोक्का'अंतर्गत कारवाई होणार आहे. या प्रकरणातील चार आरोपींना अद्याप अटक होणे बाकी आहे.
बीड शहराच्या बालेपीर भागात एका शिक्षकाचा दिवसा ढवळ्या खून झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. या प्रकरणात आरोपी म्हणून गुज्जर खानचे नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने चार राज्यांत पाठलाग करुन यातील मुख्य आरोपी गुज्जर खानला अटक केली होती.
गुज्जर खानवर यापूर्वीही खंडणीसाठी मारहाण करणे आणि दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पाठविला होता. शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवलाल पुरभे यांनी तयार केलेल्या या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरिक्षकांनी अनुमती दिली आहे. यामुळे या गुन्ह्यात आता मोक्का कायद्याचे कलम 3 (1)(1), 3 (2), 3 (4) ही कलमे वाढविण्यात आली आहेत. यातील गुज्जर खानसह बारा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, इतर चार आरोपींना अद्याप अटक करणे बाकी आहे. या प्रकरणात मोक्का कायद्याचे कलम लागल्याने आता हे प्रकरण अंडर ट्रायल चालणार आहे.
हेही वाचा : बीडमध्ये काकाला तर परळीत बहिणीला पराभवाचा धक्का!