बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावामध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे. यंदा गावातील बाबासाहेब पवार यांचे मस्साजोग (ता. केज) येथील जावई दत्तात्रय गायकवाड यांना हा मान मिळाला. मिरवणुकीनंतर जावयाला कपडे आणि सोन्याची अंगठी ग्रामस्थांच्यावतीने देवून जावयाचा सत्कार केला जातो.
केज तालुक्याताल विडा येथे मागच्या 80 ते 90 वर्षांपासून धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढव मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. तत्कालीन जहागिरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला साधारण 80-90 वर्षांपूर्वी असेच मिरवले आणि ही परंपरा सुरू झाली. या परंपरेत कधीही खंड पडला नाही आणि साधी कुरबुर देखील झाली नाही हे याचे विशेष.
हेही वाचा - 'कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हस्तांदोलन करू नका'
आतापर्यंत गावातील सर्वच समाजाच्या जावयांना हा मान मिळालेला आहे. एकदा मान मिळवलेला जावई पुन्हा मिरवत नाहीत. यामुळे यातून सामाजिक सलोखा आणि एकोपा देखील दिसून येतो. एकदा जावई पकडला की तो साऱ्या गावाचा होऊन जातो. लग्नात घोड्याचा हट्ट करणारे जावई एकदा हाती लागले की गुमान गाढवावर बसतात. चपलांचा हार घातलेले गाढव, त्यावर जावई आणि वाजत गाजत गावभर मिरवणूक झाल्यानंतर ग्रामदैवत राजा हनुमान मंदिराच्या पारावर मनपसंत कपड्याचा आहेर केला जातो.
हेही वाचा - 'कोरोना'मुळे रंगाचा बेरंग, रंग खरेदीकडे नागरिकांनी फिरवली पाठ
यंदा गावातील पवार यांचे जावई दत्तात्रय गायकवाड यांना हा मान मिळाला. जावई शोधला तरी यंदा गाढव शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गावात एकही गाढव नसल्याने शेवटी भाड्याने गाठव आणावे लागले.