बीड - मोटारसायकल समोर हरीण आल्याने झालेल्या अपघातात भारतीय सैन्यदलातील जवान आसाराम उर्फ अशोक विष्णू ठोंबरे (वय 26 वर्षे, रा. दहिफळ वड) हे जखमी झाले होते. बीड यथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी (दि. 27 जून) पहाटे मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 23 जून) केज-बीड रोडवर झाला होता.
आसाराम ठोंबरे हे आसाम येथे भारतीय सैन्यात कर्तव्यावर होते. परंतु मागच्या आठ दिवसांपूर्वी ते गावाकडे सुटीवर आले होते. पण, बुधवारी (दि.23 जून) दुपारी ते केजहून गावाकडे मोटारसायकलीवरुन जात असताना केज बीड रोडवरील कदमवाडी-उमरी फाट्यादरम्यान एक हरीण आडवे आल्याने अपघात झाला व त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना बीड येथील एका खासगी दवाखान्यात भरती करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती.
दरम्यान, त्यांना पुढील उपचारासाठी शनिवारी (दि. 26 जून) पुणे येथील सैन्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण, रविवारी पहाटे त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली.
आसाराम हे तीन वर्षांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते व दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी व एक आठ महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्यावर सोमवारी (दि. 28 जून) दहिफळ या त्यांच्या मूळगावी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - गर्दी टाळली नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम, तज्ज्ञांचा इशारा