आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात अँटिजेनचा खडखडाट; पाच हजार किटची मागणी - Shortage of Antigen Kit in Ashti
गेल्या आठ दिवसांपासून आष्टी ग्रामीण रुग्णालयात अँटिजेन किट नसल्याने तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे.

आष्टी(बीड) - झटपट निदानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या अँटिजेन किटचा साठा संपला आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला ब्रेक लागण्याची भिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून आष्टी ग्रामीण रुग्णालयात अँटिजेन किट नसल्याने तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे.
आष्टी शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कॉन्टॅक्ट ट्रेस वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल येण्यासाठी 24 ते 48 तास लागत असल्याने उपचारास विलंब होत आहे. म्हणून झटपट निदानासाठी अँटिजेन किटचा उपयोग केला जातो. परंतु गेल्या आठ दिवसांपासून आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात अँटिजेन किट उपलब्ध नाहीत.
सकाळीच शहरासह परिसरातील नागरिक आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना टेस्टसाठी येतात. येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीत अँटिजेन तपासणीची मोहिम सुरू आहे. दररोज जवळपास शेकडो नागरिक अँटिजेन करण्यासाठी येऊन दिवसभर थांबून परत जात आहेत. त्यामुळे आष्टीचा गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांचा अकडा कमी होत नसून, अँटिजेन तपासणीला खिळ बसल्याने रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात अँटिजेन किटचा तुटवडा असून आम्ही जिल्हा विभागाकडे पाच हजार अँटिजेन किटची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप आम्हाला किट प्राप्त झाले नाहीत. तरी नागरिकांनी याकामी डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोरे यांनी केले आहे.