बीड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे गेवराई येथे रविवारी आगमन झाले. यावेळी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली अभुतपूर्व अशी मोटार सायकल रॅली काढून या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
रॅलीनंतर शहरातील र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या विराट जाहीर सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, माजी आमदार राजन पाटील, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, उषाताई दराडे, रवींद्र क्षिरसागर, उमेश पाटील, भारतीताई शेवाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, गेवराईकरांनी उस्फुर्तपणे काढलेल्या मोटार सायकल रॅलीच्या उत्साहातच विजयसिंह पंडितांच्या विजय निश्चित आहे. देवेंद्र आणि नरेंद्रांमुळे आपले भवितव्य घडणार नाही, तर बिघडणार आहे. शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण ताकद दिली पाहिजे. घोटाळे आणि चौकशी लागलेले लोक राष्ट्रवादी सोडून जात आहेत. पण छत्रपती शिवरायांचा विचार रक्तामध्ये असणारा एकही राष्ट्रवादीचा मावळा पक्ष सोडून गेला नाही. त्यामुळे जे गेले त्यांच्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वच्छ झाला, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, महापुरुषांच्या फोटोत पैसे खाणार्या सत्ताधार्यांना छत्रपतींच्या प्रतिमेला हात लावायची लायकी नाही. छत्रपतींचा विचार मनामध्ये घेऊन आणि पवित्र शिवनेरी किल्ल्याची माती कपाळी लाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ केला आहे. त्याला महाराष्ट्रभर अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये माझा विजय झाल्यानंतर जो आनंद मला होईल, त्याच्या दहापट आनंद मला गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतर होणार आहे, असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
सत्ताधार्यांची महाजनादेश यात्रा ही महाधनादेश यात्रा आहे, असा आरोपही मुंडेंनी यावेळी केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य महाराष्ट्रात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. गल्ली ते दिल्ली भाजप-सेनेची सत्ता असताना गेवराई विधानसभा मतदारसंघात कोणता विकास झाला ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विजयसिंह पंडित हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महानाट्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घरात नेणारे नेते आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून जनतेत बसणारा तरुण तडफदार नेता जेव्हा विधानसभेत येईल तेव्हाच गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊन विकास होईल, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला. सत्ताधार्यांच्या यात्रेला पोलिसांचे कडे आहे तर शिवस्वराज्य यात्रेला छत्रपतीच्या मावळ्यांचे कडे..! मला गेवराईत पाहावयास मिळाले, असे म्हणत येणार्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडितांना मतांचा आशीर्वाद त्यांना द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विजयसिंह पंडित म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गेवराईकरांना पीटीआर देणार असल्याच्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करुन दिल्ली-मुबंईच्या गप्पा मारणार्यांनी दत्तक घेतलेल्या गेवराईकरांना वार्यावर सोडले, असा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, या सरकारच्या काळामध्ये महिला असुरक्षित आहेत. यांच्या सत्तेत महिला पोलिसांवर अत्याचार होत आहेत.
विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली निघाली अभुतपूर्व मोटार सायकल रॅली -
शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख खा. अमोल कोल्हे यांचे गेवराई नगरीत आगमन होताच स्वयंस्फुर्तीने उपस्थित असलेले हजारो मोटार सायकलधारक युवकांनी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली अभुतपूर्व मोटार सायकल रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरुन सभास्थळापर्यंत काढण्यात आली. दरम्यान, संपूर्ण गेवराईनगरी राष्ट्रवादीमय झाली होती तर एकच राजे विजयराजे या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. या मोटार सायकल रॅलीमध्ये पृथ्वीराजे,रणवीर राजे यांच्यासह चार हजार मोटार सायकलसहीत युवक सहभागी झाले होते.