पुणे - बीड जिल्ह्यात १३ हजार ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढले असल्याचे समितीच्या अहवालातून समोर आले आहे. त्या महिलांना त्रास होत आहे. मात्र, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल. याबाबत सरकारने दखल घेतली असून उपाययोजना सुरू केल्या असल्याचे चौकशी समितीच्या अध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्या पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने २६ जून २०१९ ला चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना नेमण्यात आले आहे. गेल्या ३ वर्षात या समितीने बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी केली. या काळात जवळपास ८२ हजार महिलांची तपासणी करण्यात आली. यामधील १३ हजारांपेक्षा जास्त महिलांचे गर्भशाय काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १५ वर्षांपासून हे सर्व घडत आले असल्याचे समोर आले आहे.
राज्यशासनाचा आरोग्य विभाग, साखर आयुक्त यांना याबाबत माहिती देऊन ऊसतोड महिलांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून यामध्ये योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.