बीड : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी सभा मराठवाड्यातील बीडमध्ये आज होत आहे. पहिली सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला या ठिकाणी झाली होती. त्यानंतर त्यांची दुसरी सभा मंत्री धनजंय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीड शहरामध्ये होत आहे. हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सभा मंडपाचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित बॅनर : काही तासातच शरद पवार या ठिकाणावरून बीडसह मराठवाड्यातील व राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर आज अनेक नेत्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. शरद पवार आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्या बॅनरवर 'साहेब कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या' असा मजकूर लिहिलेला आहे.
बॅनरवर माझे फोटो वापरू नका : शरद पवार यांनी अजित पवार गटाला बॅनरवर माझे फोटो वापरू नका, असे सांगितले होते. तरीही त्यानंतर त्यांचे फोटो वापरण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. 'साहेब कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या' अशा आशयाचे बॅनर अजित पवार गटाचे उपाध्यक्ष अविनाश नायकुडे यांनी लावले असल्याची माहिती मिळत आहे. या बॅनरवरुन शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. अजित पवार गटाचे कार्यकर्ते स्वाभिमानी असतील तर त्यांनी शरद पवारांचे फोटो वापरु नये, असे शेख यांनी म्हटले आहे. जर शरद पवारांचे आशीर्वाद हवे असतील, तर भाजपाला सोडचिठ्ठी देवून पुन्हा परत या, असे शेख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :