बीड - परळी येथील पूजा चव्हाण प्रकरणात पुढे येऊन पूजाच्या आजीने पूजासाठी न्याय मागितला होता. ही बाब पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना खटकलेली असून शांताबाई राठोड या आमच्या कोणीच नाहीत, असे सांगत परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोडविरोधात पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकारानंतर माझ्या जीवाला धोका असल्याचे शांताबाई राठोड म्हणाल्या.
माध्यमांसमोर घेतली खुलेपणाने भूमिका
पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येमागे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा पूजा चव्हाणच्या आजी शांताबाई राठोड यांनी लावून धरली होती. एवढेच नाही तर पुण्यामध्ये जाऊन त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी शांताबाई राठोड यांनी माध्यमांसमोर खुलेपणाने भूमिका घेतली आहे. यावरून मोठा गोंधळ सुरू आहे.
'...तर तेच जबाबदार असतील'
बुधवारी माध्यमांशी बोलताना शांताबाई राठोड म्हणाल्या, की मी पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी पुढे आलेले आहे. असे असताना मला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहेत. एवढेच नाही, तर आता माझ्या जीवालादेखील धोका निर्माण झाला आहे. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर जे पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी आहेत तेच जबाबदार असतील. ही बाब मी या ठिकाणी स्पष्ट करत आहे. माझ्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी मी आता गप्प बसणार नाही, असे त्या म्हणाल्या.
'तिच्या कुटुंबीयांनाच वाटत नाही न्याय मिळावा'
बीडची पूजा चव्हाण हिच्यावर अन्याय झालेला आहे. हा अन्याय पुरोगामी महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. असे असताना आम्ही न्याय मागण्यासाठी पुढे आलेलो आहोत. या प्रकरणात पूजाच्या कुटुंबीयांनाच न्याय मिळावा, असे वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.