बीड - एकही दिवस शाळेत न गेलेल्या वयाच्या १० व्या वर्षापासून गो-पालनाचे काम करणाऱ्या ६० वर्षीय शब्बीर सय्यद यांना आज पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. निरक्षर असूनही आयुष्यभर आपल्या गो-पालनाच्या कामाशी प्रामाणिक राहिलेल्या शब्बीर सय्यद या मुलखावेगळ्या माणसाचे जीवन सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आजघडीला शब्बीर सय्यद यांच्याकडे १०० हून अधिक गावरान गाई आहेत. त्यांच्या मागील ५० वर्षाच्या कार्याचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
शब्बीर सय्यद उर्फ चाचा यांचे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवडी हे छोटेसे गाव. जेव्हा शब्बीर १० वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील पुराण सय्यद हे गाई पाळायचे. तेव्हा त्यांच्या वडिलांनी शब्बीर तुला गाई सांभाळायच्या आहेत हे माझे काम पुढे तू करायचे असे सांगितले. तेव्हापासून ते गाई सांभाळायचे काम करत आहेत. विशेष म्हणजे ते एकही दिवस शाळेत गेलेले नाहीत. त्यांना लिहिता-वाचता येत नाही. त्यांच्या कुटुंबात पत्नी व २ मुले आहेत. दोन्ही मुले सय्यद शब्बीर यांच्याबरोबरच गाई संभाळण्याचे काम करतात.
सय्यद शब्बीर यांनी दुष्काळातदेखील मोठ्या चिकाटीने १०० गाईंचा सांभाळ केलेला आहे. त्यांच्या या चिकाटीचा व कर्तुत्वाचा आज सन्मान झाला आहे. असे असले तरी आज घडीला चारा व पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण सय्यद शब्बीर यांच्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोणी मदत केली काय आणि नाही केली काय तरी मी माझे गाई संभाळण्याचे काम प्रामाणिकपणे करत राहणार, असेही ते यावेळी म्हणाले.