बीड - राष्ट्रवादीला मतदान केले म्हणून भाजपचे आमदार भिमराव धोंडे यांच्या शाळेवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकाने भावकीतील एका व्यक्तीला मारहाण केली. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील भवानी नगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुग्रीम बाजीराव मिसाळ, असे या शिक्षकाचे नाव असून त्याने आप्पासाहेब शहादेव मिसाळ यांना मारहाण केली आहे. मिसाळ यांच्यावर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर आप्पासाहेब यांनी अंमळनेर पोलीस ठाण्यात गोरख दशरथ मिसाळ, आशाबाई दशरथ मिसाळ, सुग्रीव बाजीराव मिसाळ, सचिन आप्पा मिसाळ, शिवाजी बाजीराव मिसाळ, नितीन शिवाजी मिसाळ, आजिनाथ शिवाजी मिसाळ, गणेश शिवाजी मिसाळ, दिपक गोरख मिसाळ आणि गोरख मिसाळ यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या बाजूला सुग्रीव यांनीही आप्पाराव शहादेव मिसाळ, हरिभाऊ शहादेव मिसाळ, बळीराम शहादेव मिसाळ, मधुकर गेणा मिसाळ, सतीश मधुकर मिसाळ, अंबिका बळीराम मिसाळ, मुक्ता शहादेव मिसाळ, शोभा मधुकर मिसाळ यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
आप्पासाहेब यांनी दिलेल्या तक्रारीत, राष्ट्रवादीला मतदान केले म्हणून आपल्याला मारहाण केल्याचे म्हणण्यात आले आहे. तर सुग्रीव यांनी पाण्याच्या टँकरची तक्रार केली म्हणून मला मारहाण झाल्याची तक्रार केली आहे. ही भांडणे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून झाली असावी, अशी माहिती अंमळनेर पोलिसांनी दिली. घटनेचा पुढील तपास अंमळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेश गडवे करत आहेत.