बीड - रोजच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने २५ जुलैला विषारी रसायन पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात, छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी वडवणी तालुक्यातील एका शालेय विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा टवाळखोरांच्या छेडछाडीने एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा बळी गेला आहे.
आत्महत्या केलेली मुलगी तिच्या मामाच्या गावाला इयत्ता १० वी च्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसापूर्वी गावातील अशोक रामदास केदार (वय १९) या टवाळखोराने शाळेत तिची छेड काढली होती. हा प्रकार तिने आपल्या मामाला सांगितल्यानंतर, मामाने गावात बैठक बोलून सर्वांसमोर त्या मुलाला समजावून सांगितले होते. पुन्हा असा प्रकार करू नये म्हणून मामाने त्या मुलाच्या घरी देखील सांगितले होते.
मात्र, त्यानंतर चार दिवसांनी २५ जुलैला आरोपी अशोक रामदास केदार याने पुन्हा शाळेत जावून सदर मुलीची छेड काढत, शाळेत तिची बदनामी केली. यानंतर चार वाजता मुलगी मामाच्या शेतातील घरी आली आणि तिने विषारी रसायन पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती घरात पडलेली पाहून लहान मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिला उपचारासाठी तात्काळ आंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २९ जुलैच्या रात्री साडेदहा वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मृत मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरुन आरोपी अशोक रामदास केदार याच्याविरुध्द कलम ३०६ सह पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी अशोक हा फरार आहे.