बीड : आज संत वामन भाऊ यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा येणार असल्याची शनिवारी दिवसभर चर्चा होती. मात्र अचानक त्यांचा दौरा का रद्द झाला. याचेही स्पष्टीकरण त्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित वेळी पंकजा मुडेंची अनुपस्थितीही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पंकजा मुडेंची अनुपस्थिती : त्याचबरोबर आज बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नसणार आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अनेक वेळेस पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी एकाच स्टेजवर येतात. त्यावेळेस त्यांच्यामध्ये अनेक वेळा राजकीय वाद उफाळल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र चक्क देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात पंधरा दिवसात दोन वेळेस येत आहेत. दोन्ही वेळेस पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या गैरहजर आहेत. या मागचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.
राजकीय चर्चांना वेग : स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांनी अनेक दिवसापासून चालू ठेवलेला व्यसनमुक्ती कार्यक्रम त्यांच्या पश्चात सुरू ठेवण्यासाठी शिवसंग्राम पक्षाने कंबर कसली. हा कार्यक्रम घेण्यात ते यशस्वी झाले. त्याच वेळेस या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी हजेरी लावली. पण पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या मात्र आल्या नाहीत. आजही संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात येत आहेत. मात्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या कार्यक्रमाला नसल्यामुळे राजकीय चर्चांना वेगळच वळण लागले आहे.
अपघातामुळे धनंजय मुंडे अनुपस्थीत : माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात दौरा करत असताना त्यांच्या अपघात झाला. याच अपघातामुळे धनंजय मुंडे हे संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीला हजेरी लावू शकत नाहीत. विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे गेल्या 20 वर्षापासून संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या पूजेसाठी प्रमुख म्हणून हजेरी लावायचे पण काही दिवसापूर्वी झालेल्या अपघातामुळे धनंजय मुंडे हजेरी लावू शकत नाहीत.