बीड- संजय दौंड यांना धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. संजय हे शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी संजय कारणीभूत ठरले होते.
हेही वाचा- विधान परिषद : महाविकास आघाडीकडून संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विशेष म्हणजे परळी विधानसभा मतदार संघात वंजारी समाजाच्या मतांवर प्राबल्य असलेल्या इतर कुटुंबापैकी एक दौंड कुटुंब आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पंकजा मुंडे यांना संजय यांची आमदारकी अडसर ठरू शकते.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संजय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणाची समिकरणे बदलणार आहेत. संजय यांचे वडील माजी मंत्री पंडितराव दौंड यांचा मोठा जनसंपर्क आहे. याशिवाय सतत अकरा वर्ष संजय यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले असल्यामुळे ग्रामीण भागावर त्यांची पकड आहे.
1992 पासून बीड जिल्हा परिषदेत संजय सक्रिय राहिलेल्या आहेत. त्यांच्या पत्नी आशाताई दौंड या धर्मापुरी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्या आहेत. मागच्या वेळी त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या.