बीड - लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. आता विधानसभेची मोर्चेबांधणी सर्व पक्षांकडून आणि इच्छुक उमेदवारांकडून सुरू झाली आहे. बीडमधील केज विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. येथील भाजपच्या विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केज मतदारसंघ आता जिल्ह्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
२०१४ मध्ये केज मतदारसंघातून अनेक चेहरे भाजपकडून उमेदवारीसाठी चर्चेत होते. हा मतदारसंघ अनुसूचित जागेसाठी राखीव आहे. पक्षांतर्गत स्पर्धा असतानाही संगिता ठोंबरे यांनी बाजी मारली. मोदी लाटेत बीडमध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले. त्यात संगिता ठोंबरे देखील होत्या. पण, आता या विधानसभा निवडणुकीत ठोंबरे यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या लोकसभा निवडणुकीत डॉ. अंजली घाडगे यांनी प्रीतम मुंडे यांच्या बाजूने प्रचार केला. त्यामुळे घाडगे यांचे नाव केज मतदारसंघासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ठोंबरे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ठोंबरे यांचे तिकीट कापले, तर त्या काय भूमिका घेतात याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.