बीड - गौण खनिज अधिकाऱ्यांनी छापा टाकून वाळूसाठा पकडत फोटोसेशन केले. मात्र, त्यानंतर वाळू माफियांनी मध्यरात्री वाळूसाठा पळवून नेत अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याने खळबळ उडाली. ही घटना बीड जिल्ह्यातील पाली शिवारात घडली. मात्र, याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत.
बीड तालुक्यातील पाली येथे जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह इतर एका व्यक्तीच्या जागेत वाळूसाठा असल्याची माहिती गौण खनिज अधिकारी आनंद पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री साडेअकरा वाजता गौण खनिज अधिकाऱ्यांनी 50 ब्रास वाळूसाठा जप्त केला होता. मात्र, वाळूसाठ्याजवळ एकही अधिकारी अथवा गौण खनिज अधिकाऱ्यांचे अंगरक्षक थांबले नाहीत. त्यामुळे जप्त केलेली 50 ब्रास वाळू माफियांनी पळवली. बुधवारी रात्री साडेअकरा दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांना कारवाईबाबत माहिती करून पोलीस फौजफाटा मागवला. मात्र, तोपर्यंत गौण खनिज अधिकाऱ्यांनी जप्त केलेली 50 ब्रास वाळू माफियांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे.
मागील एक महिन्यापासून बीड जिल्ह्यातील वाळूसाठा प्रकरण सर्वत्र गाजत आहे. पुन्हा गुरुवारी वाळूमाफियांनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेला वाळूसाठा पळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वाळू जप्तीची कारवाई झाल्यानंतर गौण खनिज अधिकाऱ्यांनी वाळूसाठ्याच्या रक्षणासाठी एकही अधिकारी अथवा कर्मचारी का ठेवला नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याशिवाय कारवाईला जाण्यापूर्वी ग्रामीण पोलिसांना का कळवले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत अधिकारी मात्र काहीच बोलायला तयार नाहीत. परंतु, या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बोलताना दिली. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही जी. श्रीधर यांनी यावेळी सांगितले.