बीड - शासनाने मोठा गाजावाजा करत शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. मात्र, बीड शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे एक पथक प्लास्टिक बंदीसाठी स्थापन केले होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बीड शहरात व जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला आहे. शासनाने प्लास्टिक बंदी करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये ६ नगरपालिकांमधून प्लास्टिक बंदीला भक्कम करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले होते. शहरांमध्ये होणारा कचरा नगरपालिकेला उचलावा लागतो. विशेष म्हणजे प्लास्टिकची पिशवी कुजत नसल्याने साचलेला कचरा नष्ट करणे अवघड जाते. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाअंतर्गत शहरांमधून होत असलेल्या प्लास्टिक पिशवीचा वापर कायमचा थांबवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या व जनजागृती देखील करण्यात आली.
एवढेच नाही तर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाअंतर्गत एक पथकदेखील स्थापन करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात काही कारवाया झाल्या. मात्र, नंतर कारवाया थंडावल्या असल्याची वस्तुस्थिती आहे. बीड शहरात भाजी मंडईसह मोंढा परिसरात फेरफटका मारला असता प्रत्येक दुकानावर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचे वास्तव पाहायला मिळाले. जर शहरात पथकांमार्फत प्लास्टिक बंदी केली आहे, कारवाया झाल्या आहेत तर मग आज स्थितीत व्यापारी खुलेआम प्लास्टिक पिशव्या वापरतात कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत बीड नगरपालिकेतील प्लास्टिकविरोधी पथक प्रमुख विश्वंभर तिडके यांच्याशी याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की मागील वर्षभरात ६ टन प्लास्टिक जप्त केलेले आहे. ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. तसेच जाहिरात व इतर जनजागृतीसाठी ५० हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, वास्तवात प्लास्टिकबंदी फोल ठरली असल्याचे चित्र बीड शहरासह जिल्ह्यातील धारूर, अंबाजोगाई, परळी, गेवराई, माजलगाव, आष्टी आदी ठिकाणी आहे.