बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती थेट आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानंतर कुमावत यांनी माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे यांना आपल्या पथकासह धाड टाकण्यासाठी पाठवले. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री करत धाड टाकली असता तीन पीडितांची सुटका करण्यात आली. तर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या पथकाने केली कारवाई : ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पंडकर, अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पथकातील पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे, पोलीस हवालदार अतिश देशमुख, पोलीस हवालदार अशोक नामदास, पोलीस नायक ढगे, पोलीस कॉन्स्टेबल संतराम थापडे, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम कानतोडे व पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी केली.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन : सुटका करण्यात आलेल्या तिन्ही पीडितांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे चालू असल्यास त्याची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पोलिसांपुढे मोठे आव्हान : बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या आदेशाने लाखो रुपयांचा गांजा पोलिसांनी जाळला. जिल्ह्यात असे अनेक अवैध धंदे आहेत, ज्यावर पोलीस अनेकवेळा कारवाई करत असतात. मात्र, अवैध धंदे करणारे व्यक्ती पोलिसांना न जुमानता हे धंदे पुन्हा नव्याने सुरू करतात. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अवैध धंदे कायमचे बंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रशासन कठोर पावले उचलणार आहे.
हेही वाचा: