बीड - 'थॅक्यू, बाबा' म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी आज सायंकाळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर नतमस्तक होत लोकसभा निवडणुकीतील विजय त्यांना समर्पित केला. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी बीडकडे जाताना रस्त्यात ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी पंकजा व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे स्वागत केले.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी विक्रमी मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय प्राप्त केला. सायंकाळी विजयाचे प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी डॉ. प्रितम या पंकजा मुंडे यांच्यासह बीडकडे रवाना झाल्या. बीडला जाण्यापूर्वी त्यांनी डॉ. अमित पालवे, गौरव खाडे यांच्यासह परळीत प्रभू वैद्यनाथाचे तसेच दक्षिणमुखी गणपतीचे दर्शन घेतले.
गोपीनाथ गडावर नतमस्तक -
पंकजा व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'थॅक्यू, बाबा' म्हणत त्यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांना समर्पित केला व त्यांचे आभार मानले. 'संडे टू मंडे, गोपीनाथ मुंडे,'मुंडे साहेब अमर रहे' अशा घोषणांनी गडाचा परिसर यावेळी दणाणून गेला होता.
गुलालांची उधळण अन् फटाक्यांची आतिषबाजी
पंकजा व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या वाहनांचा ताफा बीडकडे जाताना रस्त्यात ठिक-ठिकाणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी जेसीबी मशिनने गुलाल उधळला तर काहींनी स्वागतासाठी भले मोठे पुष्पहार आणले होते, प्रत्येक गावात व चौका- चौकात त्यांचे जंगी स्वागत झाले.