बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड पोलीस दलातील श्वान 'रॉकी' चा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी आपण टीव्हीवर एक भावनिक दृश्य पाहिलं असेल, ज्यात बीड पोलीस दलाने श्वान रॉकीला सन्मानाने अंतिम निरोप दिला होता, असे मोदी म्हणाले. रॉकीने 350 हून अधिक केसेसमध्ये पोलिसांना मदत केली होती.
बीडच्या रॉकीचं 15 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. मागच्या 8 वर्षापासून रॉकी बीड पोलिसांच्या मदतीसाठी काम करत होता. मात्र, आजारपणामुळे 15 ऑगस्ट रोजी त्यांने अखेरचा श्वास घेतला.
रॉकीने 2016 साली कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते. खून आणि दरोड्यासारख्या मोठ्या गुन्ह्याचा तपास रॉकीने लावला होता. त्याच्या निधनानंतर बीड शहरातील एसपी ऑफिसमध्ये पोलिसांनी रॉकीला मानवंदना वाहिली. अगदी कोरोनाच्या संकटकाळात सुद्धा सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण रॉकीला देण्यात आले होते.