बीड : बीड येथील कथीत व्यसनमुक्ती केंद्रातून 28 रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवले. तर केज, मोरेवाडी येथील तब्बल 100 पेक्षा जास्त लोकांना त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक्सपायर झालेल्या औषधी, बेकायदेशीर स्टाफ, खोटी कागदपत्रे, गोळ्या औषधे आढळून आली आहेत. हे चारही केंद्र सील करण्यात आले आहेत, तसेच या प्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. सुरेश साबळे : व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली रोज सर्रासपणे बेकायदेशीर कामे केली जात होती. मोठ्या प्रमाणावर एक्सपायर झालेले औषध या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर वापरली जात होती. तसेच ही सर्व केंद्र बेकायदेशीर असल्याचे स्वीकारण्यात आले असून; त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती डॉ. सुरेश साबळे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकार : नवजीवन नशामुक्ती केंद्रातील भोंगळ कारभाराविरोधात आणि झालेल्या अन्यायाविरोधात डॉ. संध्या वाघमारे यांनी तक्रार केली. त्या नवजीवन नशामुक्ती केंद्रात रेसिडेन्स मेडिकल ऑफिसर होत्या. त्यामुळे त्यांना तिथल्या भोंगळ कारभाराची कल्पणा होती. आणि म्हणून तेथील संचालकां विरुध्द आवाज उठवला. संचालक अंजली पाटील आणि राजकुमार गवळे हे नवजीवन नशामुक्ती केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वेठीस धरुन त्यांच्याकडून भरमसाठ पैशांची वसूली करित आहेत, तिथे कुठल्याचं रुग्णांवर उपचार केले जात नाहीत, रुग्णांना योग्य ती औषधे दिली जात नाहीत. शिवाय मला अनेक प्रकारे त्रास दिला.
महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी : त्याचबरोबर आंबेजोगाई येथील वाघाळा या ठिकाणी असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रातील एका महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी करून; त्यांना दाबून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. राजकुमार गवळे, अंजली पाटील व ओम डोलारे यांच्याविरुद्ध आंबेजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.