बीड - गेवराई तालुक्यामधील नागझरी येथील पारधी वस्तीवर शनिवारी तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. भावकीच्या वादातून हा खून झाला असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे चार महिन्यापूर्वी पारधी समाजातील दोन गटांमध्ये वसतीवर वाद झाला होता, यातून एकाचा खून झाला होता. त्याच वसतीवर पुन्हा शनिवारी एका युवकाचा खून झाला आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संजय काका चव्हाण (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - बायकोला माहेरी पाठवल्याच्या रागातून जन्मदात्या आईची निर्घृण हत्या
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे पारधी वस्तीवर शनिवारी दुपारी दोन गटात वाद झाला. वाद येवढा वाढत गेला की यात संजय चव्हाण नावाच्या (वय 23) तरुणाचा खून झाला. जखमी अवस्थेत तरूणाला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या तरूणाला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र, उपचारादरम्यान संजय चव्हाण यांचा मृत्यू झाला. पुढील तपास गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड करत आहेत.
हेही वाचा - जळगावातील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या खुनाचा उलगडा
शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांचा विरोध -
बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी संजय चव्हाणला मृत घोषित केले. यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह प्रक्रिया सुरू केली असता, मृताच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती नियंत्रणात आणली.