बीड - 'मी विधानसभा निवडणुकीत हरले, पराभूत झाले. पण माझ्यापेक्षा कार्यकर्ते हे जास्त दुखावले गेले. लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून गेल्यापेक्षा हे मोठे दु:ख नाही. 'जिंदगी के रेस में जो आपको दौडकर हरा नहीं पाते है, वो आपको तोड कर हराने की कोशिश करते है' त्यामुळे माझ्या माणसांना कुणीही तोडलेले मी खपवून घेणार नाही. आपल्या एकीची वज्रमूठ कायम ठेवा, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडावरील 'आपला दसरा ' कार्यक्रमात सांगितले. आपल्या तडाखेबंद भाषणात चौकार, षटकारांनी त्यांनी विरोधकांना पुरते घायाळ केले.
दरवर्षीप्रमाणे भाजपा नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सावरगाव ता. पाटोदा येथे भगवान भक्तीगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. पण, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्ह करून 'ऑनलाईन' मेळावा घेतला. माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार भीमराव धोंडे, केशवराव आंधळे, आ. मोनिका राजळे, आ. मेघना बोर्डीकर, खासदार डाॅ. भागवत कराड, प्रवीण घुगे, अक्षय मुंदडा, निळकंठ चाटे, नगरचे अरुण मुंडे, लातूर जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, डाॅ. कायंदे तसेच ऊसतोड कामगार व मुकदम यावेळी उपस्थित होते.
सावरगाव येथे पोहोचताच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मस्थळावर जाऊन वंदन केले. त्यानंतर विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले. ऑनलाईन मेळाव्यास संबोधित करताना त्या म्हणाल्या की, भगवानगडावर येत असताना महिला आणि कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले. भगवान बाबांची मूर्ती आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या कीर्तीमुळे माझे स्वागत होत आहे. आज मी एका ग्रामपंचायतची सदस्यही नाही. पण तरीही महिलांनी ठिकठिकाणी माझं स्वागत केलं. तुम्हाला माझी काळजी आणि मला तुमची काळजी हीच, आपली शक्ती आहे. आता पद, प्रतिष्ठा, सत्ता नसतानादेखील आपल्याला एकीची वज्रमुठ कायम ठेवायची आहे, असेही पंकजा म्हणाल्या. 'पंकजा मुंडे घरातून बाहेर पडणार नाही, अशी चर्चा होती. भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली. पण, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. भगवान गडावर दर्शन घेतल्याशिवाय माझा दसरा मेळावा पूर्णच होऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी मास्क काढून रिस्क घेतली, म्हणून मीही तुमच्यासाठी मास्क काढून उभे राहिले' असं सांगत पंकजांनी मास्क न घालता भाषण केले.
सरकारने शेतकऱ्यांच्या पॅकेजची रक्कम वाढवावी -
नांदेडमध्ये अतिवृष्टी भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, १० हजार कोटींमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची रक्कम आणखी वाढवावी, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दसरा मेळाव्याच्या शुभेच्छाही दिल्या. 'कोरोनाचे सगळे नियम तोडून मी उसतोड कामगारांच्या भेटीसाठी निघाले होते. तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. ते मला हक्काने रागवतात. ते माझे मोठे भाऊ आहेत. ऊसतोड कामगारांसाठी किती आदळआपट करणार, असे मुख्यमंत्र्यांनी विचारले. तेव्हा सांगलीत ऊसतोड कामगार अडकले आहेत, त्यांची सुटका करा असा विषय त्यांच्या कानी टाकला, त्यांनीही सकारात्मक निर्णय घेतला आणि लगेच सांगलीतून ऊसतोड कामगारांना घरी जाता आले, असा किस्साही त्यांनी सांगितला.
..मग काय ढाब्यावर बसून निर्णय घ्यायचे का?
मुंबईत बसून निर्णय होत नाहीत. मग काय ढाब्यावर बसून निर्णय घ्यायचे का? ऊसतोड कामगारांसाठी नेता हा मुंबईतच काय, दिल्लीत बसला तर काय हरकत आहे? अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला. ऊसतोड कामगारांचे महामंडळ तयार झाले नाही, ऊसतोड कामगारांच्या अपेक्षा पूर्ण झाले नाही. याची मला खंत आहे. ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, हा विषय सप्टेंबरमध्येच मिटला असता. दोन बैठकांचा निर्णय दोन महिने भिजत ठेवला. कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला असे म्हणत त्यांनी खेदही व्यक्त केला.
'ऊसतोड कामगारांबद्दल शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी बोलण्यासाठी लवाद नको असं म्हणणारांनी यात राजकारणच जास्त केले. कामगारांना २१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळावी असे मी म्हणाले. आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे. शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन हा निर्णय मार्गी लावला पाहिजे', अशी विनंतीही त्यांनी केली. कामगारांना न्याय मिळावा या भूमिकेत मी आहे. २७ तारखेपर्यंत निर्णय व्हावा अन्यथा ऊसाच्या फडातून कामगारांना परत बोलावू असेही त्या म्हणाल्या.
बीडचं नाव देशात करायचंय -
बीड जिल्हा ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. मागील पाच वर्षांत खूप लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही केले आहे. लोकांसाठी कसे काम करायचे, रस्त्यांवर कसं उतरायचं हे आम्हाला चांगले माहिती आहे. मुंडे साहेब हे दिल्लीत गेले होते. त्यामुळे पक्षाच्या स्तरावर मोठे काम करावे लागले. दिल्लीत गेले म्हणजे, बीड सोडले असा त्याचा अर्थ होत नाही. जिल्ह्याचं नाव देशात मोठ करायचंय, महाराष्ट्रातच मी लक्ष देणार आहे', असंही त्यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवर मेळावा घ्यायचाय -
आमचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे होऊ शकला नाही. आपल्या मेळाव्याचा जल्लोष हा मोठा असतो. पण, पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठा मेळावा घ्यायचा आहे. एकदा आपल्याला शिवाजी पार्कसुद्धा भरवायचे आहे. शिवाजी पार्कमध्ये संघर्ष यात्रेचा समारोप करायचा आहे. त्यासाठी एक दिवस शिवाजी पार्कवर सभा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.
परळी ते सावरगाव जंगी स्वागत -
सावरगावला जाण्यासाठी पंकजा मुंडे सकाळी ९.३० वा. परळी येथून निघाल्या. गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. रस्त्यात सिरसाळा, दिंद्रुड, तेलगांव, वडवणी, बीड शहर, चऱ्हाटा, चुंबळी, कुसळंब, हनुमान गड येथे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी वाहनांचा ताफा थांबवून त्यांचे जंगी स्वागत केले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा सावरगांव येथे पोहोचण्यास थोडा उशीर झाला.