बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर परिसरातील मुकुंदराज मार्गावर येल्डा रोड येथे एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्याच जिल्ह्यात बोगस अपंग शाळा; कारवाईची मागणी
अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्लीतील रसुल सत्तार कुरेशी (वय 32) हे रात्रीच घरातून बाहेर गेले होते. ते परत न आल्याने नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृतदेह रेणुकाई मंदिर परिसरात वीटभट्टीच्या मागे सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा - साखरपुड्यातच विवाह उरकुन कोरोनाग्रस्तांना दिली एक लाखाची मदत
दरम्यान, घटनास्थळी मृतदेहाजवळ दगड आढळून आल्याने दगडाने ठेचून त्यांचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस उप-अधीक्षक राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेतील आरोपीचा शोध पोलीस घेत असून रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे करत आहेत.