बीड - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 400 हून अधिक झाली आहे. कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बीड शहरातील व्यापाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट घेण्यासाठी शनिवारी सुरुवात झाली. दिवसभरात 2 हजार 601 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 86 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यावर शनिवारी बीड शहरात एकूण 6 केंद्रावरून तपासणी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 2 हजार 601 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये 86 जण कोरोना संक्रमित असल्याचे उघडकीस आले.
बलभीम महाविद्यालयात केलेल्या तपासणीत 342 पैकी 11 पॉझिटिव्ह, मॉ वैष्णवी पॅलेस 396 पैकी 9 पॉझिटिव्ह, जिल्हा परिषद शाळा अशोकनगर येथे 384 पैकी 16 पॉझिटिव्ह, राजस्थानी विद्यालयात 551 पैकी 20 पॉझिटिव्ह, चंपावती प्रायमरी स्कूल बुथ 1 वर 455 पैकी 11 पॉझिटिव्ह, चंपावती बुथ क्र 2 वर 473 पैकी 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1 हजार 468 झाली आहे.
नव्याने बाधित आढळून आलेल्या रुग्णांना आरोग्य विभागाने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारपर्यंत बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांची जिल्हा प्रशासन तपासणी करणार आहे.