बीड - कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून जिल्ह्यात नवे 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 315 वर पोहोचला आहे. यापैकी 135 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पहाटे 26 रिपोर्ट तपासणीसाठी आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शुक्रवारी पहाटे आलेल्या रिपोर्टनुसार बीड तालुक्यातील 9 गेवराई 1, परळी 12, आष्टी 1, माजलगाव 1, अंबाजोगाई 1 , असे एकूण 25 रुग्ण आढळले आहेत. तर 1 अहवाल अनिर्णीत आहे.
जुलै महिन्यामध्ये कोरोना आटोक्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बीड जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करण्यात येत असून एकूण सहा ठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर उभे केले आहेत. बीड जिल्हा रुग्णालय, परळी, गेवराई व आष्टी या ठिकाणावरून कंटेनमेंट झोनमधील व इतर संशयित असलेल्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे